इंदापूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपूर्वीच अधिकारी मुलाखतीसाठी उपस्थित राहील्यानंतर आज कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे कारखान्यात आले. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत त्यांनी कारखान्याच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. तोंडावर आलेल्या गळीत हंगामासाठी आवश्यक कामे कशी सुरू आहेत, याची पाहणी करीत आवश्यक सूचना संचालक मंडळाने आज अधिकाऱ्यांना दिल्या.
आज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत छत्रपती कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी महत्वाचे निर्णय घेतले. साखर आयुक्तांच्या सूचनेनुसार कारखान्याच्या परिसरात छत्रपती मंगल कार्यालयात १०० बेडचे कोरोना रुग्णालय सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाली. येत्या दहा ते पंधरा दिवसांत सुरवातीच्या टप्प्यात ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक पूर्ततेसाठी पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली व बैठकही घेतली. या बैठकीस बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर हेही उपस्थित राहीले होते. बारामतीत त्यांनी केलेल्या कोविड केअर सेंटरच्या अनुभवाचे सादरीकऱण त्यांनी भवानीनगर येथील कोविड केअर सेंटरसाठी केले. तसेच तिकडील सर्व माहिती संचालक मंडळास दिली.
यानंतर काटे यांच्यासह जाचक कारखान्यात पोचले. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडून सूचना होत्या. त्यानुसार कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालकही उपस्थित होते. त्यांनी कारखान्यातील सुरू असलेल्या हंगामपूर्व दुरुस्तीची माहिती घेतली. पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या यासाठी अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत प्रत्यक्ष हंगामावेळी घ्यावयाची विभागनिहाय काळजी याबाबतही सूचना दिल्या गेल्याचे समजते.











