इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरच्या रस्त्याचे सध्या वर्णन असे करता येईल की, या रस्त्याने जायचे म्हणजे एक आयता पाठीचा कणा, गुडघ्याचे स्पेअर पार्ट बरोबर घेऊन जायचे.. मग तो इंदापूर- बारामती रस्ता असेल किंवा बावडा बारामती रस्ता असेल..! खड्डेमय झालेल्या या रस्त्यावर प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नाही, खर्च मात्र काढला जातो, याचा निषेध करण्यासाठी काटेवाडीच्या खडड्यात वृक्षारोपण करून युवा पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला.
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता
इंदापूर- बारामतीचा रस्ता काटेवाडीपासून सुरू होतो, तो रस्ता अगदी इंदापूर शहरातील सरस्वतीनगर पर्यंत पोचेपर्यंत हा रस्ता आहे की, चंद्रावरील खाचखळगे हेच कळत नाही. या रस्त्याला केंद्र शासनाची मंजूरी मिळाली असून संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग म्हणून तो राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची तयारी सध्या सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया व्हायची तेव्हा होईल, सध्याच्या खड्ड्यांनी प्रवाशांसह तालुक्यातील नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. या खड्ड्यातून कोण मार्ग काढेल याकडे विनवणी करीतच प्रवासी या रस्त्यावरून जात असतात. गेल्या काही महिन्यांपासून ही परस्थिती कायम आहे. काही दिवसांपूर्वीच पाऊस पडत असताना दुचाकी खड्ड्यात आपटून एका जोडप्याचा मृत्यूही इथे झाला होता, तरीदेखील प्रशासनास अजूनही जाग येत नाही.
आज सणसर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, श्रीनिवास कदम, इंदापूर बाजार समितीचे संचालक सचिन भाग्यवंत, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे यांनी काटेवाडी- मासाळवाडी भागातील मोठ्या खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध केला. गंमत म्हणजे त्यानंतर सलग दोन तास या खड्ड्यातील झाडाच्या बाजूने वाहने जात होती. एवढा मोठा खड्डा येथे पडलेला होता. असे दोन-दोन फूटाचे खड्डे इंदापूर -बारामती रस्त्यावर जागोजागी पाहायला मिळत आहेत.
तोच प्रकार बीकेबीएन या बारामती निरा नरसिंहपूर रस्त्याचा आहे. इंदापूर तालुक्यात हा रस्ता एवढा खिळखिळा झाला आहे की, गाडीचा शेतातील रस्ताही त्यापुढे बरा दिसेल. डांबर बाजूला जाऊन त्यातील खडी उचकटलेलीही अनेक ठिकाणी पाहायला मिळत असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही. याही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मंजूरी व आर्थिक तरतूद आलेला हा रस्ता अजूनही जैसे थेच आहे.
अभयसिंह निंबाळकर, माजी उपसरपंच सणसर – इंदापूर – बारामती रस्त्याची दैन्यावस्था आहे. महाराष्ट्रातील प्रगत तालुक्याची ही अवस्था आहे. जर कामे व्हायची असतील, तर त्य़ाला अजून कितीतरी वर्षे लागतील. मग दहा वर्षे येथील नागरिकांनी वाट पाहायची का? दहा वर्षानंतर कोट्यवधींचा रस्ता होईल, मात्र त्यासाठी या रस्त्यावरून आज जाणारे व्यवस्थित तरी राहीले पाहिजेत, ज्यांना हा रस्ता पाहता येईल. प्रशासनाचे अधिकारी अत्यंत निर्लज्ज आहेत. खड्डे बुजविण्यासाठी ते जो खर्च टाकतात, त्याचे ऑडिट नीट होत नाही, किंबहुना त्याचे पुरावे राहत नाहीत म्हणूनच त्यांची मग्रुरी वाढली आहे. मात्र लोकांच्या संयमाची परिक्षा सरकार पाहते आहे असेच वाटते.











