किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात उल्लेखनीय कामगिरी करत सभासदांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारखान्याच्या कामकाजात विविध सुधारणा करत योग्य नियोजन राबवले. सुरुवातीपासून सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते आणि त्या घोषणांची अंमलबजावणीही प्रत्यक्षात करण्यात आली आहे.
सन २०२५–२६ च्या गळीत हंगामात कारखान्याने शेवटच्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाचे सुमारे १८–१८ कोटी रुपयांचे देयक थेट ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा केले आहे. “वजन चोख, पैसे रोख” या धोरणानुसार यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी एकूण २३६ कोटी ३० लाख रुपये इतकी रक्कम सभासदांना अदा करण्यात आली आहे. याशिवाय ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांची पंधरवड्याची बिलेही वेळेत भागवण्यात आली आहेत.
या हंगामात कारखान्याने १०४ दिवसांत ७ लाख ५६ हजार २८५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून ११.३६ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला असून, मागील दहा हंगामांच्या तुलनेत हा सर्वाधिक उतारा ठरला आहे. मात्र कार्यक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पादन घटले आणि त्यामुळे नियोजित गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही.
पुढील गळीत हंगामासाठी उसाची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने संचालक मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १० मार्च ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत को-८६०३२ आणि एम.एस. १०००१ या जातींच्या उसाची पाच फूट सरी पद्धतीने रोप लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या योजनेत रोपांच्या किंमतीपैकी ५० टक्के रक्कम सभासदांनी भरायची असून उर्वरित ५० टक्के कारखाना तात्पुरती देणार आहे.
नंतर लागवड केलेला ऊस गाळपासाठी आल्यावर ती रक्कम ऊस बिलातून वसूल केली जाईल.
तसेच या पद्धतीने लागवड केलेल्या उसासाठी प्रति टन १०० रुपयांचे अनुदान देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. रोप लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जास्त उत्पादन घेणाऱ्या पहिल्या तीन सभासदांना विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत. मात्र या योजनेअंतर्गत लागवड केलेला ऊस श्री छत्रपती कारखान्यालाच गाळपासाठी देणे बंधनकारक असेल.
ज्या सभासदांना रोपे खरेदी करून लागवड करायची आहे त्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे. अशी माहिती अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
यावेळी संचालक मंडळातील अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकाळ, माधुरी राजपुरे तसेच कार्यकारी संचालक अशोक जाधव आणि जनरल मॅनेजर हनुमंत करवर उपस्थित होते.











