मुंबई : राज्यातील क्रीडा संस्कृतीला नवी चालना देण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षातील विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जाहीर करण्यात आले आहे. यानुसार छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथे, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड येथे तसेच कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा बारामती येथे आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले तसेच कबड्डी, कुस्ती, हॉलीबॉल व खो-खो संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, राज्यातील युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना समान संधी देणे हे शासनाचे ध्येय आहे. राज्यस्तरीय स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून ती खेळाडूंच्या गुणवत्तेची कसोटी असते. अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळते आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी आवश्यक अनुभवही मिळतो.
त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राला समृद्ध क्रीडा परंपरा लाभलेली आहे. कुस्ती, कबड्डी, खो-खो आणि हॉलीबॉल यांसारख्या खेळांमध्ये राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, दर्जेदार सुविधा, नियोजनबद्ध आयोजन आणि पारदर्शक निवड प्रक्रिया यावर भर देण्यात येत आहे.
बारामती येथे कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा होणार असल्याने बारामतीसह पुणे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना उच्च दर्जाच्या स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव घेता येणार असून क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांनाही चालना मिळणार आहे.
राज्यभरातील विविध भागांत या स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे क्रीडाविकासाचा लाभ सर्व क्षेत्रांना समानपणे मिळणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धांमधून भविष्यात महाराष्ट्राला अधिकाधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.











