दौलतराव पिसाळ, वाई
वाई शहर आणि परिसरात गेली अनेक वर्षे शरीराविरुद्ध तसेच मालमत्ता विरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन तरुण गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईनंतर वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय असलेल्या यश उर्फ वश्या अभिजीत सोंडकर (१९, रा. गंगापुरी, वाई) आणि मेघराज उर्फ सोन्या संतोष मोरे (२०, रा. गंगापुरी, वाई) या दोघांवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, शिवीगाळ, धमकावणे असे अनेक गंभीर आणि दखलपात्र गुन्हे दाखल होते.
वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे यांनी या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डीबी विभागाचे फौजदार सुधीर वाळुंज यांनी प्रस्ताव तात्काळ तयार करून हद्दपार प्राधिकरण पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर केला.
हा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी तपासून पाहिला. दोन्ही आरोपींवर वेळोवेळी अटक व प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असली तरीही त्यांनी गुन्हेगारी थांबवली नव्हती. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते आणि कडक कारवाईची मागणी करत होते.
सदर सुनावणीत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दोन्ही आरोपींना संपूर्ण सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर तडीपारी, मोक्का, एमपीडीए सारख्या कठोर कारवाया सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने कळवले.
सरकार पक्षाच्या वतीने सुनावणीदरम्यान अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस, तसेच वाई पोलिस ठाण्याचे पो.कॉ. नितीन कदम आणि निलेश देशमुख यांनी आवश्यक पुरावे सादर केले. या कारवाईमुळे वाई परिसरातील नागरिकांत दिलासा व्यक्त केला जात आहे.











