महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी देशाच्या निर्यातीत सतत सहा महिने सुरू असलेल्या घसरणीनंतर सप्टेंबर मध्ये 5.27 वाढ नोंदवली गेल्याचे ट्विटरवर पोस्ट केले असून सप्टेंबर मध्ये देशाची निर्यात 27.4 अब्ज डॉलरवर गेली आहे.
कोरोना येण्यापूर्वी गेल्या सप्टेंबर मध्ये हेच प्रमाण 26.02 अब्ज होते. वाढलेली निर्यात ही देशाची अर्थव्यवस्था वेगाने रिकव्हर होत असल्याचा संकेत मानला जात आहे.
निर्यातदार संघटना फियोचे अध्यक्ष शरद कुमार सराफ यांच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे चीन विरोधी वातावरण जगभर निर्माण झाले असून, जगभरातील देशांचा चीनवर राग आहे याचा फायदा भारताला मिळाला आहे.
पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड मोहिमेचा हा दृश्य परिणाम आहे. कोरोना महामारी मुळे मार्च 2020 पासून जागतिक मागणी कमी होती त्यामुळे निर्यात घसरत चालली होती. पेट्रोलियम, चामडे उत्पादने, अभियांत्रिकी साहित्य आणि मौल्यवान रत्न दागिने या क्षेत्रांना घसरणीचा फटका अधिक बसला होता.
भारतीय व्यापार संवर्धन परिषदेचे अध्यक्ष मोहित सिंघला म्हणाले,आता आंतरराष्ट्रीय बाजार उघडू लागले आहेत. आणि परदेशी ग्राहकांच्या ऑर्डर येऊ लागल्या आहेत खाद्य,कृषी मालाची निर्यात पहिल्याप्रमाणेच राहील असा अंदाज आहे.










