अकोला : महान्यूज लाईव्ह
मला लग्नासाठी पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही असे भावनिक पत्र एका ३४ वर्षीय तरुणाने शरद पवार यांना दिले आणि या अनोख्या विनंतीला आता प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तरुणासाठी वधूसंशोधन करणार असून, लग्नाचा संपूर्ण खर्च पक्ष उचलणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी दिली आहे.
८ नोव्हेंबर रोजी अकोल्यात शरद पवार यांच्या दौर्यादरम्यान या तरुणाने त्यांना पत्र दिले होते. त्या पत्रात त्याने आपल्या अविवाहितपणाबद्दलची खंत आणि एकाकीपणामुळे निर्माण झालेली मानसिक वेदना मांडली होती. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, तिच्या घरी राहायला आणि काम करायला तयार आहे, असे तो म्हणाला होता. कृपया माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी, हे तुमचे माझ्यावर मोठे उपकार ठरतील,” असे त्याने पत्रात लिहिले होते.
हे पत्र वाचल्यानंतर व्यासपीठावरील सर्वजण काही काळ स्तब्ध झाले होते. त्यानंतर हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांकडून जिल्हा पदाधिकाऱ्यांना त्या तरुणाला मदत करण्याचे आदेश देण्यात आले. संग्राम गावंडे यांनी सांगितले, पक्षाने आम्हाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या तरुणासाठी योग्य वधू शोधावी आणि त्याचे आयुष्य स्थिर करण्याची जबाबदारी घ्यावी.
या घटनेने समाजातही एक वेगळी चर्चा पेटली आहे. अविवाहित तरुणांवर सोशल मीडियावर नेहमीच विनोदी पोस्ट्स आणि मिम्स येत असतात, पण या पत्रामुळे अविवाहितपणाच्या सामाजिक आणि मानसिक बाजूचा गंभीर विचार समाजासमोर आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून घेतलेला हा निर्णय सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून, या तरुणाचे आयुष्य नव्या वळणावर येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.











