विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यात गेल्या दोन दशकांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, उद्योग, शेती आणि सिंचन या सर्वच क्षेत्रांमध्ये पवार यांच्या पुढाकारामुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. हा विकास टिकवून ठेवण्यासाठी आणि पुढील पिढीकडे नेतृत्वाची सूत्रे सोपवण्यासाठी शेतकरी नेते सतीश काकडे यांनी एक महत्त्वपूर्ण मागणी केली.
सतीश काकडे यांनी सांगितले की, अजितदादांनी गेल्या काही वर्षांत विकासाची मजबूत परंपरा निर्माण केली आहे. आता ही गती कायम राखण्यासाठी नव्या पिढीला पुढे आणणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी निंबूत गटातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार किंवा जय पवार यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी थेट मागणी अजितदादांकडे केली.
काकडे म्हणाले, अजितदादांनी विकासाची परंपरा निर्माण केली आहे. ही गती कायम ठेवायची असेल तर नव्या पिढीला पुढे आणणं गरजेचं आहे. सतीश काकडे यांच्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांनीही पाठिंबा दर्शवला. मलिक म्हणाले, अजितदादांनी विकासाचा पाया रचला आहे. आता त्या पायावर नव्या पिढीने उभारणी करावी.
त्यामुळे अजित पवार पुढे कोणता निर्णय घेतात आणि पवार घराण्यातील कोणाला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जर जय किंवा पार्थ पवार यांनी निंबूत गटातून निवडणूक लढवली, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव असल्याने त्या पदावरही पवार कुटुंबातील व्यक्तीची वर्णी लागू शकते.
या अगोदर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही गुणवडी शिर्सुफळ गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. दरम्यान,निंबूत येथे झालेल्या श्रीराम मंदिर, भैरवनाथ मंदिर आणि मदिना मस्जिद यांच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार स्वतः उपस्थित होते. या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी मंत्री नवाब मलिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रामदास काकडे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.











