विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामती शहरात सोमवारी दिवसभर वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला. शहरातील शिवाजी चौक, बसस्थानक परिसर, सिनेमा रोड, स्टेशन रस्ता तसेच महावीर पथ या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या गोंधळामुळे नागरिकांना तासन्तास कोंडीत अडकून रहावे लागले, तर पोलिस प्रशासन मात्र ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरले.
चौकांमध्ये पोलिसांचा पत्ता नाही
शहरातील शिवाजी चौक ते बसस्थानक या मार्गावर सोमवारी सकाळपासूनच वाहनांचा ओघ वाढला. याचवेळी महावीर पथ व स्टेशन रस्त्यावरही वाहतुकीचा ताण वाढल्याने संपूर्ण परिसर ठप्प झाला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या वेळी वाहतूक पोलिस कर्मचारी परिसरात उपस्थित नव्हते. त्यामुळे रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहने या सगळ्यांची रांग लागली होती.
पार्किंग आणि अतिक्रमणांचा गंभीर प्रश्न
बारामतीतील रस्त्यांवर अस्ताव्यस्त पार्किंग,मनमानीने थांबणाऱ्या रिक्षा, आणि वाढती अतिक्रमणे या तिन्ही समस्यांमुळे वाहतूक नियंत्रणाची अवस्था अधिक बिकट झाली आहे. व्यापारी वर्गातील अनेकांनी आपल्या दुकानांजवळ कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय केलेली नाही. परिणामी या दुचाक्या थेट रस्त्यावर उभ्या राहतात आणि रस्ते अरुंद होतात.त्यामुळे ग्राहक आणि नागरिकांना चालण्यासाठीही जागा उरत नाही.
वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या बदलीनंतर वाहतूक शाखा पुन्हा उदासीन झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत. पूर्वी नियमितपणे चौकांमध्ये पोलिस कर्मचारी दिसत असले, तरी आता फक्त काही वेळ दर्शन देऊन ते गायब होतात,अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. वाहतूक नियोजनाचा अभाव आणि प्रशासनातील समन्वयाच्या कमतरतेमुळे शहरातील दैनंदिन वाहतूक कोलमडून पडली आहे. नगरपरिषद आणि पोलिस प्रशासन या दोघांच्याही निष्क्रियतेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
पुढील काळात आणखी अडचणींचा अंदाज
सध्या शाळा व महाविद्यालये सुट्टीवर आहेत, दोन तीन दिवसांत शिक्षणसंस्था सुरू झाल्यावर रस्त्यांवरील वाहनसंख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे सध्याच योग्य नियोजन न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.











