विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : भिगवण रोडवरील वंजारवाडी गावातील जगदंबा हॉटेलमध्ये झालेल्या चोरी आणि घरफोडी प्रकरणातील चार आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी भोर येथून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
ही घटना १६ ऑक्टोबर रात्री ११ वाजता ते १७ ऑक्टोबर सकाळी ७ वाजेपर्यंत, अज्ञात चोरट्यांनी हॉटेल जगदंबाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.त्यांनी ३२ हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ३२,००० रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी विजय मोहिते यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी अनिल सुनिल निकम,गणेश मधु निकम (दोघे रा. वडगाव डाळ, ता. भोर, जि. पुणे) या दोघांनी त्यांच्या साथीदारांसह चोरी केली असल्याचे उघड झाले. भोर येथे पोलिसांनी धाड टाकून या दोघांना अटक केली.
चौकशीत त्यांनी आपल्या साथीदारांची नावे उघड केली आरोपी रवी मंगेश जाधव, रवी बंडु थोरात (दोघे रा. म्हातोबानगर, मुळशी,सध्या रा. रूई, ता. इंदापूर) रूई येथे छापा टाकून पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपींकडून ७ मोबाईल फोन आणि १,०५० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपासात आणखी मोबाईल हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व अंमलदार दादासाहेब दराडे, सुरेंद्र वाघ, किशोर वीर, भारत खारतोडे, निलेश वाकळे यांनी केली.











