लक्ष्मण जगताप, बारामती
महाराष्ट्राच्या त्रिशा ठोसर या सहा वर्षांच्या चिमुकलीला नुकताच देशाच्या राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट बालकलाकार या पुरस्काराने रजत कमल देऊन गौरविण्यात आले. नाळ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार प्राप्त झाला. ७० वर्षांत हा सन्मान मिळविणारी ती सर्वात लहान बालकलाकार आहे. त्रिशाचा झालेला गौरव सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
इतक्या लहान वयात तिने या पुरस्काराला घातलेली गवसणी प्रेरणादायी आहे. पालक म्हणून त्रिशाच्या आईवडीलांचे खूप कौतुक वाटते. त्रिशाला लहानपणापासूनच नटायची, मुरडायची तसेच आरशात पाहून नकला, नाटके,अभिनय करायची आवड आहे हे तिच्या पालकांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. त्यांनी तिची ही आवड आणि कला जोपासली. त्यासाठी पूरक वातावरण निर्माण केले. त्रिशाला प्रोत्साहन देऊन तिची आवड व कला विकसित व्हायला मदत केली. म्हणूनच त्रिशाने या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
प्रत्येक मुलात नैसर्गिकरित्या काही सुप्त कला गुण, क्षमता व कौशल्ये लाभलेली असतात. ती शोधून काढण्यात पालक आणि शिक्षक यांची जबाबदारी मोठी असते. पुढे जाऊन याचआवड आणि कलेतून मुलांचे भावी आयुष्यातील करिअर घडते. म्हणून लहानपणापासूनच मुलांचे निरीक्षण करावे, त्यांचे बोलणे, त्यांचे हावभाव, त्यांचा आवाज, इत्यादी गोष्टींकडे खूप लक्ष देणे आवश्यक असते.
रोजच्या सरावाने आणि प्रयत्नातून कला चांगल्या प्रकारे विकसित होते. कालांतराने एक उत्तम कलाकार निर्माण होतो. परंतु ही कलाकार घडण्याची प्रक्रिया एका दिवसातील नाही. त्याची पायाभरणी लहानपणापासूनच घातली जाते. पाल्याला जास्त काय आवडते, तो जास्त कशात रमतो, त्याला कशात जास्त आनंद वाटतो, कोणत्या गोष्टी मनापासून आणि आवडीने करतो. याकडे बारकाईने पाहावे.
मुलांच्या अंगी गायन, वादन, अभिनय, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, हस्तकला, वक्तृत्व, कथाकथन अशा विविध कला असतात. आपल्या पाल्याची आवड पाहून त्याची कला विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असते. तसेच त्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन द्यावे.ती कला विकसित करण्यासाठी त्याला पूरक मार्गदर्शन करावे. त्या त्या कलेतील तज्ज्ञ लोकांचे जास्तीचे मार्गदर्शन घ्यावे.
जेणेकरुन आपला पाल्य त्या कलेत पारंगत होईल. त्याच्या आवडीच्या कलेतील सगळी कौशल्ये तो उत्तमप्रकारे आत्मसात करुन शकेल. सततचा सराव आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे ती कला अंगात भिनते.त्यातून एक उत्तम कलाकार घडतो.यासाठी मुलांकडे लहानपणापासूनच लक्ष देणे आवश्यक असते. (लेखक प्रेरणादायी वक्ते आहेत.)











