ज्ञानेश्वर रायते, बारामती
आज शिक्षकदिन. खरंतर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा खरा शिक्षकदिन. पण असो, या दिवसाच्या निमित्ताने बारामतीतील त्या संन्यस्त शिक्षकाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. केरळ मधून महाराष्ट्रात आलेल्या आणि आयुष्यभर शिक्षक म्हणून राहिलेल्या आणि कधीही निवृत्त न झालेल्या बारामतीच्या या संन्यस्त शिक्षकाची ही कहाणी.
नाव – के. एस. अय्यर! मुक्काम -श्रीकृष्ण रेस्टॉरंट, बारामती, रूम नंबर २०२. तब्बल 35 वर्ष एकाच लॉजमधील एका खोलीत राहिलेला हा शिक्षक देशातला सर्वोच्च दर्जाचा शिक्षक होता. मुक्कामाच्या निमित्ताने या रूममध्ये आलेले अय्यर सर थेट 35 वर्षांनी बाहेर पडले तेही त्यांच्या शेवटच्या प्रवासाच्या निमित्ताने…
आज भरमसाठ पगार सुखासीन आयुष्य आणि ऐशोरामाची नोकरी म्हणून कायम सेवेत असलेल्या प्राध्यापकाच्या नोकरीकडे पाहिले जाते. पण पगारातला पैसा गरजेपुरताच स्वतःसाठी ठेवून बाकीची रक्कम बाकीची रक्कम विद्यार्थ्यांसाठी खर्च करणारे किती प्राध्यापक आहेत? कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून केरळ मधून आलेल्या अय्यर सरांनी महाराष्ट्राची आपली कर्मभूमी मानली. आयुष्यभर सायकलवर फिरणाऱ्या या महान प्राध्यापकांनी वेतन वाढ नाकारली होती हे ऐकले तर आश्चर्य वाटेल. केवळ सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव वेतनवढ स्वीकारलेल्या या प्राध्यापकाने गरजेपुरती रक्कम उघडा संपूर्ण पगार सातत्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला.
अय्यर सरांमुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो असे सांगणारे कैक विद्यार्थी आजही बारामतीत सापडतील. बारामतीच्या तुळजाराम चरित्र महाविद्यालयात शिकवणारे अय्यर सर आयुष्यभर सायकलवर फिरले. गरीबी होती म्हणून नाही, तर गरजा अत्यंत कमी होत्या म्हणून!
गांधीजींच्या प्रेरणाने क्षण सेवेत आलेल्या हायर सरांनी लग्न केले नव्हते आपले इंग्लिश विद्यार्थ्यांना समजले पाहिजे याच्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या अय्यर सरांचे महत्त्व आताच्या काळात आणखीनच उठून दिसते. लॉजच्या आठ बाय १० च्या खोलीत एक कॉट, मोजकेच कपडे, एक कपाट आणि त्यात पुस्तकं, पुस्तकं आणि पुस्तकं एवढाच या माणसाचा संसार होता. दिवसातून एकच वेळा जेवणे आणि लहान असो की मोठा त्याला आदराने वागवणे ही अय्यर सरांची जीवनशैली होती.
सन 1933.. केरळमध्ये जन्मलेल्या अय्यर सरांचे वडील सैन्य दलात होते त्यांचे शिक्षण राजस्थान बंगालमध्ये झाले. सुरुवातीला अय्यर सर यांनी रेल्वेत नोकरी केली. मग ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनशैलीकडे खेचले गेले त्यातून ते कराडला आले. तिथे नोकरी केली त्यानंतर मात्र ते बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात आले आणि तिथेच आयुष्यभर सेवा केली. महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा यांना भेटलेल्या अय्यर सरांनी त्यांच्याकडून जी तत्वे घेतली, ती आयुष्यभर आचरणात आणली. स्वातंत्र्यपूर्व मूल्यांच्या प्रभावातून सरांचं हे सगळं साधेपण, ध्येयवाद आला होता.
घड्याळी तीन तास ते सलग शिकवत. घड्याळी आठ तास शिकवण्याचाही विक्रम त्यांनी केला. एवढी वर्षं नोकरी होऊनही प्रत्येक वेळी वाचन करून, नोट्स काढूनच ते वर्गात जात असत. त्या नोट्सच्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना मोफत वाटत. एम ए च्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होताना निरोप समारंभ स्वतः सर आयोजित करायचे. जेवण स्वतः देत होते. जणू विद्यार्थी हा त्यांचा संसार होता.
पीएचडीचे शेकडो प्रबंध त्यांनी तपासून दिले. नेट सेटसाठी मोफत मार्गदर्शन केले. त्यांची लहानशी खोली फक्त पुस्तकांनीच भरली होती. आपल्या मृत्यूनंतर ही पुस्तकं विविध महाविद्यालयांना द्यावीत, असं सरांनी सांगून ठेवलं होतं. दोन इंग्लिश पुस्तकं आणि संशोधनपर असंख्य प्रबंध त्यांच्या नावावर आहेत. अय्यर सरांचं मोठेपण भारतीय गुरुपरंपरेशी जोडलंच पाहिजे.
या संन्यस्त फकीरी वृत्तीच्या प्राध्यापकाची नोंद मात्र हवी तेवढीशी घेतली गेलेली नाही. याची खंत कायम राहील. आपण करत असलेल्या या महान कामाबद्दल कधीही सन्मानाची अपेक्षा न बाळगलेल्या या शिक्षकाची खरे तर प्रत्येकाने आठवण ठेवली पाहिजे. खरंतर अय्यर सरांना स्वतःचा आत्मचरित्र लिहिता आलं असतं. पण तन मन आणि धनाने संपूर्ण शिक्षकी पेशा विद्यार्थ्यांसाठी वेचलेल्या या शिक्षकाने आयुष्यभर अनामिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला.
शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी काही वर्षांपूर्वी अय्यर सरांचे जीवनचरित्र लिहिताना महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला होता. ते म्हणजे अय्यर सर, त्यांचे जीवन पुढील पिढ्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासता आले पाहिजे. अन्यथा थोर शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्या मताप्रमाणे असा देखील एक माणूस होऊन गेला होता, यावर भावी पिढी देखील विश्वास ठेवणार नाही…! ते टाळायचं असेल तर किमान बारामतीतील सर्व महाविद्यालयांनी अय्यर सरांच्या नावाने काहीतरी योजना सुरू ठेवल्या पाहिजेत. हीच आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने अपेक्षा!











