हिंगणघाट – हिंगणघाटमधील प्राध्यापक तरुणीची आज मृत्यूशी चाललेली झुंज संपली मात्र तिच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. आरोपींविषयी प्रचंड चीड निर्माण होत असतानाच प्राध्यापक तरुणीच्या दारोडा गावात संतप्त जमावाने आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी आज रास्ता रोको केला.
आज सकाळी हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्याने तिची प्रकृती दोन दिवसांपासून खालावली होती. कालही तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टर सांगत होते. आज सकाळी उपचारादरम्यानच तिची प्राणज्योत मालवली. तिच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरोपींना जरब बसेल म्हणून आंध्रप्रदेशपेक्षाही कडक कायदा राज्य सरकार करेल असे सांगत असतानाच तिच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन तातडीने होण्यासाठी जलदगती खटला चालवू असे सांगितले. गृहमंत्री व गृहराज्यमंत्र्यांनीही तपासात कोणतीही त्रुटी राहणार नाही अशा ग्वाही दिली. मात्र या गावातील ग्रामस्थांनी रस्त्यावर येत आरोपीच्या फाशीची मागणी करीत रास्ता रोको करण्यास सुरवात केली.










