बारामती : महान्यूज लाईव्ह
१४ दिवसांच्या जनता कर्फ्युनंतर बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व व्यवहार सोमवारपासून सुरु होणार आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत बाजारपेठ सुरु ठेवण्याचा निर्णय आज प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे १४ दिवसांपासून बंद असलेले सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत.
बारामतीत ७ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यु लागु करण्यात आला होता. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसावा या उद्देशाने हा कर्फ्यु लागू करण्यात आला होता. आज या कर्फ्युच्या शेवटच्या दिवशी प्रशासन आणि व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सोमवारपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व व्यवहार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता बारवकर, मुख्याधिकारी किरणराज यादव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्यासह व्यापारी महासंघाचे नरेंद्र गुजराथी, सुशिल सोमाणी, निखिल मुथा, प्रविण अहुजा आदी या बैठकीला उपस्थित होते.
नियम आणि अटींच्या अधीन राहून बारामतीतील व्यवहार सुरु करावेत यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझरच्या वापरासह सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत या बैठकीत आग्रही भुमिका मांडण्यात आली.
मागील दोन महिन्यात बारामतीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभुमीवर अधिकाधिक काळजी घेवूनच आपले व्यवहार सुरु करावेत अशी ठाम भुमिका प्रशासनाकडून मांडण्यात आली आहे.










