नवी दिल्ली – महान्यूज लाईव्ह
जिथे आपली सत्ता येत नाही, तिथे समोरचे पक्षच फोडायचे, आधी ईडी,सीबीआय़ची भिती दाखवायची आणि भाजपमध्ये घ्यायचे, ते भाजपमध्ये आले की, कारवाई थांबवायची, त्यामुळे भाजपने आता कमळ चिन्हाऐवजी वॉशिंग मशीन हे चिन्ह घ्यावे असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला मारला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विस्तारीत कार्यसमितीची बैठक काल दिल्लीमध्ये झाली. यावेळी मार्गदर्शन करताना पवार यांनी पुढील रणनिती स्पष्ट केली. या बैठकीस २४ राज्यांतील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या ठरावानुसार मणिपूरची अशांत स्थिती व महाराष्ट्रातील आरोग्याची दयनीय अवस्था यावरही चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी पवार म्हणाले, काही वर्षांपूर्वी ईडीचे नावही कुणाला माहिती नव्हते, मात्र आता गल्लीबोळातही ईडीची माहिती झाली आहे. केवळ राजकीय सूडापोटी या ईडीचा वापर होतो, कोणतेही ठोस कारण नसताना राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांना तुरुंगवारी करायला लावली. आता आपच्या नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे.
पवार म्हणाले,तालकोटरा येथील अधिवेशनात ९० जणा्च्या समितीने माझी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. ही निवड बेकायदेशीर असल्याचा आता काही जणांना साक्षात्कार झाला आहे. माझी निवड बेकायदेशीर झाली असे म्हणणाऱ्यांनीच त्यावेळी माझ्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या केल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे आपण बाजू खंबीरपणे मांडूच, मात्र आयोगाने काही वेगळा निर्णय दिला तरी नव्या चिन्हासह निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे.











