भिगवण : महान्यूज लाईव्ह
हिरवी बहुतांश वेळा बस चालक हे बेदरकारपणे बस चालवतात अशी ओरड प्रवासी आणि रस्त्यावरील दुचाकीस्वार अनेकदा करताना दिसतात. आज इंदापूर तालुक्यातील भिगवण शेजारच्या मदनवाडी येथील एका वृद्धाचा हकनाक बळी अशाच दोन बसचालकांच्या मस्तीमुळे गेला आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर घडलेल्या या घटनेत भिगवन च्या बस स्थानकापासून काही अंतरावर ही घटना घडली. दोन बस चालकांच्या बस पुढे नेण्याच्या मस्तीत त्यांनी सुरू केलेल्या शर्यतीमुळे हा अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या घटनेमध्ये मदनवाडी येथील 62 वर्षीय गंगाराम सोमा पवार या ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 35 वर्षीय संदीप विठ्ठल डोंबाळे व 50 वर्षीय मनोहर विठ्ठल बंडगर हे दोघेजण या घटनेत जखमी झाले आहेत. दरम्यान बस चालकाने मात्र बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती दिली. मात्र जखमी झालेल्या प्रवाशापैकी एकाने हे सर्व बसचालकांच्या शर्यतीमुळे घडल्याचे सांगितले.
या घटनेत अनेक दुचाक्यांचे देखील नुकसान झाल्याची माहिती मिळाली असून भिगवण पोलिसांनी या प्रकरणी बसचालक अशोक पांडुरंग साळुंखे (रा. नागझरवाडी ता. कळंब जि. धाराशिव) या चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.











