मुंबई : महान्यूज लाईव्ह
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगणा राणावतबद्दल सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. अशातच शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही तिचा समाचार घेतला. आता मात्र ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबद्दल आपले मत नोंदवले आहे. लोक अशा वक्तव्यांना फार गांभीर्याने घेत नाहीत, त्यामुळे तिला फारसं महत्व देण्याची गरज नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आधी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधल्यामुळे कंगणाबद्दल प्रचंड रोष निर्माण झालेला होता. त्यातच आज मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयाच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई सुरु केल्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. तर पोलिसांसह महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाबराची उपमा दिली आहे. याबद्दल प्रथमच शरद पवार यांनी आपले मत नोंदवले आहे.
कंगणाच्या कार्यालयाच्या बांधकामावरील कारवाईबाबत आपणास फारशी माहिती नाही. परंतु मुंबईत बेकायदेशीर बांधकाम ही काही नवीन गोष्ट नाही. सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करून लोकांच्या मनातील शंकेला संधी मिळते. मात्र असे असले तरी अधिकाऱ्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं असेल असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र आणि मुंबईला पोलिसांच्या कामाबद्दल माहिती आहे. वर्षानुवर्षे पोलिसांच्या कामाचा येथील जनतेने अनुभव घेतला आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना केली आणि काही बोलले तरी त्याकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही. अशा गोष्टींना अधिकची प्रसिद्धी देऊन त्या मोठ्या करण्याचा प्रयत्न होतो.. त्यामुळे शहाण्या लोकांनी याकडे दुर्लक्ष करून काहीही न बोललेलंच योग्य अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकार आणि शिवसेनेला सल्ला दिला आहे.











Right