महान्यूज : आजची गझल
तू जन्माची भूल तरीही तू माझ्या जगण्याचे कारण
तुझ्याचसाठी माझ्यापाशी केवळ हे गझलेचे तारण
म्हणालीस तू मला एकदा वसंत उत्सव सुरुही झाला
निमंत्रणाविण येऊ कसा मज वरवरचे तरी दे आमंत्रण
असेल चुकले माझे तेव्हा तोल जायला नकोच होता
कशास उकरून काढतेस तू नवीन मुद्दे जुनेच भांडण
भेटायाचे नाही म्हटले तरी वाटते भेटावे तुज
उरले नाही माझे आता पूर्वी इतुके कडवे मी पण
बरेच झाले तुझा मला सहवास मिळाला दोन घडीचा
नको म्हणालीस तरी दिले मी तळे कस्तुरी तुलाच आंदण
क्षितिजाच्याही पल्याड आहे गाव तुझे तू सुखी रहावे
असेल तेथे लहरत वारा असेल बरसत माझा श्रावण
गझलकार : मधुसूदन नानिवडेकर
परीचय :
मधुसूदन गणेश नानिवडेकर
हल्ली मुक्काम : नानिवडे ता. वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग
संपर्क : ९४०४४४०२७६
व्यवसाय शेती आणि पत्रकारिता
“चांदणे नदीपात्रात” हा काव्यसंग्रह प्रकाशित
अग्रगण्य नियतकालिकांमधून कविता, गझला प्रकाशित
गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी काही गझलांचे सादरीकरण केले आहे.
आकाशवाणी व दूरदर्शन वर गझलांचे कार्यक्रम
अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग
कोकण मराठी साहित्य परिषदेचा ‘कवी माधव पुरस्कार २००८’
कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार
मालवणच्या ‘अष्टपैलू कला निकेतन’ चा ‘गझलभूषण पुरस्कार’
चिंतामणी साहित्य सहयोगचा ‘श्रीपाद काळे वाङ्मय पुरस्कार’
२०१७ साली वाशी, नवी मुंबई येथे पार पडलेल्या नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्षपद
महाराष्ट्रात अनेक मुशायऱ्यांमधून गझल सादरीकरण
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड










