महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
देशातील आजतक या माध्यमसमूहाने केलेल्या सर्वेक्षणात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या व भाजपच्या लोकांच्या टिकेने घेरलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देशात टॉप फाईव्ह मध्ये आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर आहेत. मात्र महाराष्ट्रातील ५५ टक्के लोकांनी उध्दव ठाकरे यांनाच पसंती दिल्याचे या माध्यम समूहाने नमूद केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विशेषतः राज्यात सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडी सरकारला भाजप दररोज विविध मुद्द्यांवर चहूबाजूने आरोपाच्या पिंजऱ्यात अडकवत असूनही ५५ टक्के लोक महाविकास आघाडीवर फिदा असल्याने हे सर्वेक्षण भाजपची डोकेदुखी वाढविणारे ठरले आहे. देशातील विविध राज्यांतील सरकारे करीत असलेल्या कामकाजाबाबत हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये आजतकच्या या सर्वेक्षणात तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी, चौथ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि पाचव्या क्रमांकावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत.










