भंडारा : महान्यूज लाईव्ह
जिल्हा भंडारा, तालुका लाखणीमधील पोहरा गाव गेले पंधरा दिवस दहशतीखाली आहे. रात्रभर गावभर तरुणांची गस्त चालू आहे. महिला भीतीच्या सावटाखाली आहेत. पण ज्याला शोधण्यासाठी हे सगळे चाललेय त्याचा चेहरादेखील या पंधरा दिवसात गावकऱ्यांना दिसलेला नाही.

या गावात रात्रीचा कुणीतरी दरवाजा ठोठावतो. दार उघडले की पळून जातो. कधी दिसतो, पण पाठलाग करायले गेले काही अंतरावर दिसेनासा होऊन जातो. ज्या घरात एकटी महिला असेल, तोच दरवाजा तो ठोठावत असतो. केवळ दरवाजा ठोठावून भागत नाही, तर गावातही संध्याकाळनंतर रस्त्यावरही कुणी महिला दिसली तर तिचा हात धरायलाही तो कमी करत नाही. पण आरडाओरडा झाला कि पळून जातो, काही अंतरावर गेला की दिसेनासा होतो.
स्मिता मेश्राम या महिलेला अंगणात उभी असताना झाडावरून काहीतरी पडल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिले तर एक लाल शर्ट आणि बरमुडा घातलेली व्यक्ती होती. त्याच्याजवळ मोबाईल टॉर्च होता. स्मिताने आरडाओरड केल्यावर काही तरुण आणि महिला धावून आल्या. महिलांनाही तो दिसला. पण काही क्षणानंतर तो दिसेनासा झाला. आता याप्रकारचे अनुभव गावातील इतर महिलाही सांगू लागल्या आहेत.
गावभर पंधरा दिवसांपासून तरुण पोरे गाव पिंजून काढताहेत, पोलिसांनाही कळवले आहे, त्यांचीही गस्त आहे. पण हा आहे तरी कोण याचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळेच आता हा माणूस नसून कोणतीतरी अदृश्य शक्ती असल्याच्या कहाणीने जोर पडकला आहे. हा माणुस नाही तर भूत आहे याची चर्चा वाढल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्यही गावात पोचले. त्यांनी निर्वाळाही दिला की हा कोणीतरी मानसिक विकृत व्यक्ती आहे. पण तो आहे तरी कोण हे कोडे आजही उलगडलेले नाही.
मात्र पोहरा गावात आजही दररोज अशा प्रकारच्या घटना घडणे थांबलेले नाही. त्यामुळे यामागे काहीतरी अमानवी शक्ती असल्याची लोकांच्या मनातील शंका बळावू लागली आहे.