राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड, बारामती, इंदापुर तालु्क्यात दुचाकी व इतर वाहन चोरीचे प्रकार वाढले आहेत. पण आता वाहनचोरी करणाऱ्या चोरांचे कंबरडे यवत पोलीस मोडणार आहेत. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोराल तर आता खबरदार ! यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पाटस,कासुर्डी, केडगाव यासह इतर प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीसांचे चेक नाके सुरू केले आहेत.
मागील आठवड्यात इंदापुर तालुक्यातून एक चोर दुचाकी चोरून पुण्याच्या दिशने जात असताना पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी पाटस टोल नाक्यावर दुचाकीसह एका चोरास ताब्यात घेतले. बारामती पोलीसांनीही मागील आठवड्यात दुचाकी चोरांची मोठी टोळी जेरबंद केली. दौंड तालुक्यातही दुचाकी तसेच इतर वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. हे चोर वाहने चोरून पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग,राज्य मार्ग व जिल्हा मार्गने पसार होत असल्याचे पोलीसांच्या निदर्शानास आले आहे. असा वाहन चोरीच्या घटनांना आळा बसावा व वाहनचोरांना तत्काळ जेरबंद करण्यासाठी यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कठोर
पावले उचलली आहेत. रस्त्यावरून फिरणाऱ्या व ये जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर आणि वाहनचोरांवर आता पोलीसांची करडी नजर असणार आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथील टोल नाका, कासुर्डी व केडगाव येथील बंद झालेल्या टोल नाका ठिकाणी तसेच दौंड-पाटस रस्ता, चौफुला – सुपा रस्ता, शिरूर चौफुला रस्ता, चौफुला यवत रस्ता तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घाट व इतर रस्ते यावर पोलीसांचे चेक नाके असणार आहेत. येणाऱ्या वाहनांची तसेच संशयित वाहनांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेस पोलीसांच्या विशेष पथकांची गस्त राहणार आहे. प्रत्येक वाहन हे चेक करून व खात्री झाल्याशिवाय सोडण्यात येणार नाहीत. संशियत वाहनांची सखोल चौकशी करण्याच्या सुचना संबिधत पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
यवत हद्दीतील वाहनांमध्ये एका टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. वाहन चोरीला गेल्यास चोर वाहन घेऊन कुठे जातो याची माहिती त्वरीत पोलीसांना मिळणार आहे. यामुळे यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरी करणाऱ्यांना हा एक सुचक असा सावधनतेचा इशारा पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिला आहे. मात्र नागरीकांनीही खबरदारी घेणे आवश्यक असून जागरूक राहिले पाहिजे. हलगर्जीपणा करू नये, आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावावीत. दुचाकी किंवा इतर वाहनचोरी गेल्यास तत्काळ पोलीसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शानाखाली पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग पाटस टोल नाका,पाटस – दौंड रस्त्ता,कासुर्डी, केडगाव याठिकाणी शनिवारी ( दि.१६ ) सायंकाळपासून चेक नाक्यावरून वाहने चेक करण्यास पोलीसांनी सुरूवात केली आहे. यामुळे परिसरातील नागरीकांनी
पोलीसांच्या तत्पर कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.