सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
छत्रपती कारखान्यातील आजी-माजी अध्यक्षांचे आरोप प्रत्यारोप आता थांबण्याचे नाव घेत नसून त्याला उग्र स्वरूप येऊ लागले आहे. पृथ्वीराज जाचक यांनी आज पुन्हा एकदा प्रशांत काटे यांना टीकेचे लक्ष्य बनवल्यानंतर प्रशांत काटे यांनी आज पुन्हा आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली.
सहकार अथवा खासगी संस्था या आर्थिकदृष्ट्या चालवायच्या असतात, असा उपदेशाचा डोस आम्हाला देणाऱ्यांनी उच्च न्यायालयात केस केल्या आहेत असे सांगणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, जर आर्थिकदृष्ट्या संस्थेचा विचार तळमळीने केला असता आणि संस्थेचा विचार करून विरोधासाठी विरोध केला नसता तर आज छत्रपती कारखान्याचे दोन्ही प्रकल्प नऊ वर्षे रखडले नसते आणि त्याची किंमत मोठ्या प्रमाणावर कारखान्याला आणि पर्यायाने सभासदांना भोगावी लागली नसती. आज ज्या प्रकारच्या समस्या कारखान्यापुढे आहेत, त्या समस्या निर्माण होण्यामागे कोण लोक आहेत हे कार्यक्षेत्रातील सभासदांना माहित आहे, त्याला अशाच उच्च न्यायालयातील केसेस कारणीभूत आहेत, हेदेखील संबंधितांनी लक्षात घ्यावे. अशी टीका छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यावर केली.
ते म्हणाले, छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विविध चौकशीमागे कोणाचा हात आहे आणि त्यातून छत्रपती कारखान्याची बदनामी कोणामुळे झाली हे सर्वांना माहीत आहे. वस्तुतः आता ही बाब न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय या संदर्भात योग्य तो निर्णय देईल आणि तो आम्हाला बंधनकारक असेल. मात्र कोणी कोठे कधी कोणत्या गोष्टी केल्या आहेत हे कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना माहित आहे. ज्या ज्या गोष्टी कारखान्याच्या विरोधात तक्रारीच्या स्वरूपात झाल्या, त्यामागचा बोलवता धनी कोण हे देखील कारखान्याच्या सर्व सभासदांना माहित आहे. त्यामध्ये अज्ञानपणा घेऊन सावाचा आव आणण्याची गरज नाही.
ते म्हणाले, आमच्या नेत्यांच्या घरी बसून बैठकामध्ये सहभागी झाला, त्याच आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सभागृहात बसला होतात हेही मान्य केले असते तर बरे झाले असते, मात्र तेवढी चांगली सवयच राहिली नाही.
कारखान्याच्या खरेदी, साखर विक्री, मळी विक्री यात अध्यक्षांचे उद्योग चालले होते, असे ते म्हणतात, मात्र जेव्हा मळी विक्रीत सभासदांना दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून संचालक मंडळाने निर्णय घेतला, त्यावरून थरथराट करायची गरज काय होती? दिवंगत कार्यकारी संचालकाच्या अंगावर कोण धावून गेले होते? का धावून गेले होते? नेमके कोणाचे हितसंबंध आडवे आले होते? या साऱ्याची माहिती आम्हाला आहे. योग्य वेळ आल्यानंतर सभासदांपुढे आम्ही हा विषय मांडूच, मात्र आम्हाला आमच्या नेत्यांनी अकांडतांडव करायला शिकवलेले नाही, परंतु काहीच करायला उरलेले नसल्याने काही मंडळी अकांडतांडव करत आहेत त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.
ते म्हणाले, मळी विक्रीची जेवढी टेंडर माझ्या अध्यक्षपदाच्या काळात झाली, त्या प्रत्येक टेंडरच्या संदर्भात संचालक मंडळामध्ये खुली चर्चा झाली आहे. तो एकट्या अध्यक्षांचा कधीही निर्णय नसतो. एवढेच नाही, तर हे निवडून न आलेले महाशय देखील या चर्चेत सहभागी होते. त्यावेळी संचालकांच्या व सभागृहातील सर्वांच्या सहमतीने निर्णय झालेले आहेत. जर त्यावेळी अध्यक्षांनी काही उद्योग केला असेल असे वाटले होते, तर त्याचवेळी या महाशयांनी त्यांची भूमिका का मांडली नाही? मळी विक्रीमध्ये सभासदांना दोन पैसे अधिकचे मिळावेत यासाठी संचालक मंडळाने जे काही निर्णय घेतले, त्याला उलट संबंधितांनी विरोध केला होता आणि फक्त विरोध नाही तर अगदी थयथयाट केला होता हे आम्ही विसरलेलो नाही आहोत.
खरे तर आपल्या काळात तीन हंगामात खरेदी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. दोन युनिट असताना देखील ही खरेदी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर स्टोअर कमी करण्यात आम्ही यश मिळवले आहे. ही सगळी माहिती कामगारांना आहेच, शिवाय सभासदांना ही त्याची माहिती आहे. अर्थात ही माहिती समोर असतानाही आरोप करण्यात कितपत तथ्य आहे याचे आत्मपरीक्षण संबंधितांनी केले पाहिजे. मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ संभ्रम पसरवण्याचा त्यांचा डाव आहे.
काटे म्हणाले, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सन 18-19 च्या गळीत हंगामात छत्रपती कारखान्याने 8 लाख 96 हजार टन उसाचे गाळप केले. सन 19 – 20 या गळीत हंगामात उसाचे उत्पादन कमी होते, तर 20-21 या हंगामात 9 लाख 12 हजार टन उसाचे गाळप झाले. याच हंगामात आम्ही सारे केले असे म्हणणारे हे लोक संचालक मंडळासमवेत होते. अर्थात अगदी त्यांचाही उपस्थितीचा अपवाद लक्षात घेतला तरी देखील सन 18-19 मध्ये गळीत हंगाम 8 लाख 96 हजार टन उसाचे गाळप करून पूर्ण झाला होता, त्यानंतर केवळ 16 हजार टनांची भर 20-21 मध्ये पडली.
मात्र त्याचे अवडंबर करून सगळे काही आपणच केले अशा स्वरूपाची दवंडी पिटवली जात आहे. आम्हाला यशाचा डंका वाजविण्याची सवय अजिबात नाही. त्यामुळेच आता देखील आम्ही काही न बोलता आमचे काम करत आहोत, मात्र काही जणांना उगीच श्रेय मिरवायची सवय आहे. ते वेळोवेळी इतरांचेही श्रेय स्वतःकडे घेऊन मिरवतात.
काटे म्हणाले, आम्हाला पॅनेलमध्ये घेतले जाणार आहे की नाही याच्या गोष्टी, ज्यांना आमचा द्वेष वाटतो त्यांनी करू नये. समाजकारणात अथवा राजकारणात कोणी ताम्रपट घेऊन येत नाही. जो तो आपल्या कर्माने त्या पदापर्यंत पोचतो, अथवा कर्मानुसार त्या पदावरून हटवला जातो. अर्थात ज्यांना सभासदांनी नाकारले, त्यांनी तरी पॅनलमध्ये घेण्या- न घेण्याच्या गोष्टी करू नयेत. तो अधिकार आमच्या पक्षश्रेष्ठींचा आहे, ते निर्णय घेतील.
काटे म्हणाले, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना आमच्या स्वतःच्या बागेत आम्ही तरी काम करायला लावले नाही, मात्र जर कोणाला माहित असेल तर अशा प्रथा फार पूर्वीपासून सुरू आहेत का? असा आम्हाला संशय येतो. चोराच्याच मनात चांदणे असते ही जुनी म्हण आहे. चुकीचे आरोप विरोधकांनी करू नयेत. विरोधकांची भूमिका जरूर बजवावी, मात्र वैयक्तिक स्तरावर येऊन चुकीच्या प्रकारचे विनाकारण आरोप केले तर आम्हालाही कायदेशीर पर्यायांचा विचार करावा लागेल.