बारामती : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडल क्रीडास्पर्धेत बारामती परिमंडलाच्या पाच खेळाडूंनी वैयक्तिक खेळांमध्ये विजेतेपद पटकाविले.
महावितरणची राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा नागपूर येथे नुकतीच झाली. पुणे व बारामती परिमंडलाच्या संघात बारामती परिमंडलातील 37 खेळाडूंनी प्रतिनिधीत्व केले होते. या क्रीडास्पर्धेत बारामती परिमंडलातील सोलापूर येथील महेश कोळी याने कुस्ती प्रकारात 97 किलो वजनगटात विजेतेपद मिळवले. पंढरपूर येथील राजकुमार काळे यांनी कुस्तीमध्ये 68 किलो वजनगटात, कराडच्या अश्विनी जाधव यांनी भालाफेकीत, सासवडच्या प्रवीण बोरावके यांनी गोळाफेकीत तर सासवडच्याच आकाश लिंभोरे यांनी कुस्तीत 57 किलो वजनीगटात विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत कराडच्या नितीन मांढरे यांनी कुस्तीत 74 किलो वजनगटात उपविजेतेपद मिळविले.
याखेरीज बारामती येथील मोहम्मद मुजाहिद अन्वर यांनी 4 बाय 400 रिले स्पर्धेत पुणे-बारामती संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. बारामती परिमंडलाच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून महावितरणचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांनी काम पाहिले. या सर्वांचे प्रभारी प्रादेशिक संचालक व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, ज्ञानदेव पडळकर व उदय कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.










