बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बारामतीतील खाजगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या सात कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत.
खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाव न छापण्याच्या अटीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेली माहिती अशी, बारामतीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडचा स्वतंत्र कक्ष केलेला आहे, त्यामध्ये एका दिवसात 7 कोरोना बाधित रुग्ण दाखल झाले आहेत. हे रूग्ण बारामती आणि परिसरातील असून त्यांची अधिक माहिती देण्यात संबंधित सूत्रांनी नकार दिला. मात्र तेथे आणखी सहा जण संशयित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांचा कोरोनाचा अहवाल आलेला नाही.
एकंदरीत बारामतीतही कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस बिकट होत चालला असून, तो विचार करायला भाग पाडणारा ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. परिस्थिती गंभीर होत चालली असून आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बारामतीतील खाजगी क्षेत्रात व्यवसाय करणारे वैद्यकीय तज्ञ एकत्र येऊन कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी नव्याने काही उपाययोजना करण्याच्या तयारीत आहेत, बारामतीतील कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये याकरता त्यांचे सुरू असलेले प्रयत्न स्तुत्य आहेत असे म्हणायला हरकत नाही. अर्थात नागरिकांनी मात्र घरातच बसावे अशीच सर्वांची अपेक्षा आहे.
आणखी एका तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता असून सरकारी यंत्रणेवर ही ताण येऊ लागला आहे, त्याचा विचार करता येणाऱ्या काळात सरकारीच नव्हे तर खासगी दवाखान्यांमध्ये ही कोरोना रुग्णांसाठी पुण्या-मुंबई प्रमाणे बेड करिता प्रतिक्षा करावी लागेल अशी वेळ येऊ शकते. त्यासाठी नागरिकांनी स्वतःहूनच घरात थांबण्याची गरज आहे.










