कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा;कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : महान्यूज लाईव्ह
मला बाकीचं माहिती नाही, कोरोनाचे रुग्ण वाढणार नाही याची दक्षता घ्या असे सांगत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आजच्या तालुक्याच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशासनावर भडकले. कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टरांचे नियोजन संगणकीय प्रणालीवर घ्या, या कामामध्ये कोणाचाही हलगर्जीपणा मी खपवून घेणार नाही असा इशाराच अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.
जलसंपदा विभागाच्या विश्रामगृात आज कोरोना विषाणू प्रादुर्भाव व निर्मूलन आढावा बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली. बारामती शहरासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घ्या अशी सूचना पवार यांनी केली. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच संस्थात्मक क्वारंटाईनच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्या व बारामती शहरातील खासगी रूग्णालय कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी तातडीने ताब्यात घेण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करा ही महत्वाची सूचना पवार यांनी केली.










