सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो ! ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे ! नवे पर्व ओबीसी सर्व ! बोल रे बोल हल्लाबोल !! या घोषणा देत इंदापूर तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणासाठी इंदापूर तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने व्याहाळी चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी सरकारने जातिनिहाय जनगणना करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजास पूर्वीप्रमाणे आरक्षण मिळावे.स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षणाप्रमाणे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधान परिषदेत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळावे,शासकीय सेवेत ओबीसी प्रवर्गातील नोकरदारांना पदोन्नती मिळावी,महात्मा फुले ओबीसी महामंडळाचे आर्थिक बजेटमध्ये भरघोस वाढ करण्यात यावी. शेतकऱ्यांचे शेतीमालास रास्त भाव देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सारथीच्या धर्तीवर ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी संस्था निर्माण करावी.अशा मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनामध्ये माजी सभापती दत्तात्रय शेंडे, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, आदर्श शेतकरी मोहन दुधाळ, पुणे जिल्हा समता परिषदेचे उपाध्यक्ष दशरथ डोंगरे,ॲड.कृष्णाजी यादव, इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र चांदणे, वसंत मोहोळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापुरे, सावता परिषदेचे प्रदेश संघटक संतोष राजगुरू, गोरख आदलिंग,माणिक भोंग आदींसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











