मुंबई : महान्यूज लाईव्ह
आरोग्य विभागाची परिक्षा सातत्याने वादग्रस्त ठरत आहे. आताच्या पेपरफुटीच्या प्रकरणात आरोग्य विभागाचेच अधिकारी व कर्मचारी सामील असल्याचे उघडकीस आलेले आहे.
आरोग्य विभागातील भरतीची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीत लातूरच्या आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला पाठविणाऱ्या आरोग्य विभागातील सहसंचालक महेश सत्यवान बोटले ( वय ५३, रा. मुंबई ) याला न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी हा आदेश दिला.
बोटले याला सायबर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली होती. यापुर्वीच त्यांनी लातूरच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांच्यासह ५ जणांना ७ डिसेंबरला अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मुंबईतील आरोग्य संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रश्नपत्रिका दिल्याचे बडगिरे याने पोलिसांना सांगितले होते. त्यातून बोटले यानेच प्रश्नपत्रिका बडगिरे याला दिल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाची मोठी साखळी असून दलाल, क्लासचालक, शासकीय अधिकारी व कर्मचारी यामध्ये सामील आहेत. या संपुर्ण साखळीचा पर्दाफाश करून प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यापर्यंत पोचण्यात पुणे पोलिसांनी यश मिळविले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. यात आणखी काहींची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.