इंदापूर : महान्यूज लाईव्ह
जमिनीची नोंद लावण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना इंदापुरच्या तहसील कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पडकले. आज दुपारी झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
नितेशकुमार धोंडीबा धर्मापुरीकर या लिपिकाला लाच घेताना पकडण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदारांच्या जमिनीचे वाटप झाले होते. मात्र त्याची नोंद लागलेली नसल्याने संबंधित तक्रारदाराने इंदापुरच्या तहसील कार्यालयात पाठपुरावा केला होता. मात्र लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर याने या कामासाठी २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाकाकडे तक्रार केली.
आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित तक्रारदारासमवेत लाचेची मागणी होत असल्याबद्दल शहानिशा केली. संबंधित लिपिक आणि तक्रारदार यांच्यात तडजोड होऊन १ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर याला १ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, या कारवाईनंतर इंदापूर पोलिस ठाण्यात संबंधित लिपिकावर गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.










