बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव साखर कारखान्याच्या मंडळाने चालू गळीत हंगामातील गाळपास येणाऱ्या उसासाठी एकरकमी 2780 रुपये प्रति टन एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे छत्रपती सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या 25 15 रुपये प्रतिटनी एफआरपीपैकी 2200 रुपये प्रति टनाचा हप्ता सभासदांच्या खात्यात जमा केला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या गळीत हंगामात गाळपास येणार्या उसासाठी कारखान्याच्या असलेल्या संपूर्ण एफआरपी च्या एकरकमी हप्ता देण्याचा निर्णय घेतला. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप व सर्व संचालक यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मात्र एफआरपी एकरकमी न देता मागील वर्षीप्रमाणेच हप्त्याहप्त्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने 2200 रुपयांचा हप्ता जाहीर केल्यानंतर शेतकरी कृती समितीने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी कृती समितीचे सदस्य सतीश काटे यांनी एक प्रसिद्धी पत्रक देऊन एक रकमी एफआरपी देण्याची मागणी केली आहे. कारखान्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत आलेल्या उसासाठी प्रतिटनी 2200 रुपये प्रमाणे 25 कोटी 48 लाख रुपये सभासदांच्या बँक खात्यात जमा केले आहेत.
छत्रपती कारखान्यापुढे बारा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. मात्र कारखान्याच्या कार्यक्षेत्रात बऱ्याच ठिकाणी इतर कारखान्यांची देखील ऊस तोडीची वाहने आहेत. अशा परिस्थितीमध्ये कारखाने लवकरात लवकर एफआरपी जाहीर करावी अशी मागणी उत्पादकांकडून होती, त्या पार्श्वभूमीवर मात्र कारखान्याने नाराजी व्यक्त केली आहे. या वर्षी कारखाना एकरकमी एफआरपी देईल अशी सभासदांची इच्छा होती. मात्र याहीवर्षी सभासदांना दोन हप्त्यात एफआरपी घ्यावी लागणार आहे .