बारामती : महान्यूज लाईव्ह
सरपंच म्हणजे कोण असतो? खरा सरपंच असतो गावसेवक! कुटुंबांचा प्रमुख आणि अडल्यानडलेल्यांना तत्परतेने मदत करणारा आधारस्तंभ.. अलीकडच्या काळात सरपंच राजकारणात घुसमटला.. कुरघोडीच्या चक्रव्यूहात पुरता अडकला.. वर्षा सहा महिन्याचा कालावधी पुरता त्याचा प्रभाव राहिला.. अशावेळी आठवतात, ते अगदी बोटावर मोजण्याएवढे सरपंच! जे असतात गावाच्या विकासासाठी सदैव दक्ष..! म्हणूनच मग पोपटराव पवार, भास्कर पेरे पाटील.. अशी काही नावे आपल्या स्मरणात कायम राहतात..! सध्या बारामतीतील बाबुर्डी गाव असंच काही गाजत आहे..!
या बाबुर्डी गावातील सरपंचाचं नुकतंच लग्न झालंय.. म्हणजेच सरपंच पोरसवदा आहे.. पण त्याच्याकडे प्रगल्भता एवढी मोठी गावाचा सरपंच असूनही पाण्याची टाकी स्वतः स्वच्छ करतो.. पाईपलाईन फुटली तर रात्रीच्या वेळी स्वतः पाईपलाईन जोडण्यासाठी मदत करतो.. कोरोना झाल्यानंतर दूर राहायचं अशी भावना घेऊन बसलेल्या समाजात तो फक्त अंतर सुरक्षित ठेवतो बाकी सगळं आपलेपणाने मदत करतो..!
आता अगदी कालच उदाहरण…! बाबुर्डी गावात कोविड लसीकरण आयोजित करण्यात आले होते. 150 डोस उपलब्ध झाले होते. परंतु रजिस्ट्रेशन 150 पेक्षा जास्त लोकांचे झाल्याने लस कमी पडणार असे दिसताच आशासेविका सौ. संगीता पोमणे यांनी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांना या गोष्टीची कल्पना दिली. सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी मोरगाव आरोग्य केंद्रातुन स्वतः जाऊन लस आणली.
स्वतः सरपंचांनी जाऊन लस आणली आणि बाबुर्डी गावात 200 लोकांचे लसीकरण करण्यात आले. रजिस्ट्रेशन करण्यासाठी संगणक परिचालक अमोल पोमणे, आशासेविका संगीता पोमणे आणि लस टोचण्यासाठी आरोग्यसेविका सौ.भामे उपस्थित होत्या. तशी गोष्ट छोटी, पण डोंगराएवढी होती..! फक्त राजकारण करण्यापुरता किंवा निवडणुकीपुरता सरपंच असावा, या धारणा बदलून टाकणारी तरुणाई राजकारणात येते, त्याचं समाधान मानायला पाहिजे बाबुर्डी गावाकडे पाहिलं की, हे समाधान नेमकं काय असतं ते लक्षात येईल..!