पुणे: महान्यूज लाईव्ह
राज्यात आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या संवर्गातील भरतीच्या प्रक्रियेतील लेखी परीक्षेत पेपर प्रसारमाध्यमांद्वारे फोडणाऱ्या रॅकेटचा पुणे सायबर क्राईम करून तपास सुरू आहे. आत्तापर्यंत यामध्ये 6 जणांना अटक करण्यात आली होती, तर काल पुणे पोलिसांनी आणखी 5 जणांना अटक केली. यामध्ये लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टर आणि शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील पेपरफुटीच्या घोटाळ्यात आतापर्यंत सुरेश जगताप, संदीप भुतेकर, बबन मुंडे, अनिल गायकवाड, प्रकाश मिसाळ, विजय मुऱ्हाडे यांना पुण्याच्या सायबर क्राईम पोलिस पथकाने अटक केली होती. काल नव्याने लातूर विभागातील पाच जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, डॉक्टर संदीप त्रिंबकराव जोगदंड, उद्धव नागरगोजे, श्याम महादू मस्के, राजेंद्र पांडुरंग सानप या बीड जिल्ह्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या पेपरफुटीच्या प्रकरणात काल अटक करण्यात आलेला डॉ. जोगदंड हा मनोरुग्णालयातील डॉक्टर असून मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याने जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर श्याम म्हस्के यांच्याकडून पाच लाख रुपये घेतल्याचे या तपासात निष्पन्न झाल्याने या सर्वांना अटक करण्यात आली. पेपरफुटी च्या प्रकरणात मोठी चर्चा झाल्याने आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी फिर्याद दिली. त्यावरून सायबर पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सायबर विभागाने तांत्रिक मुद्द्याच्या आधारे तपास केला.
या पाच जणांना शिवाजीनगर न्यायालयाने 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली असून ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉक्टर राजेंद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके आदींच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, फौजदार अमोल वाघमारे, संदेश कर्णे, प्रसाद पोतदार, नवनाथ जाधव, गिरीश गावडे आदींनी केली.