मुंबई : महान्यूज लाईव्ह
” कृपया संसदेत नियमितपणे उपस्थित रहा. लहान मुलासारख सतत सांगण्याची वेळ आणू नका. तुम्ही जर स्वत:मध्ये बदल घडवून आणला नाहीत, तर बदल घडवावा लागेल. ” या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वपक्षातील खासदारांना कानपिचक्या दिल्या. दिल्लीमध्ये भाजपा खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते.
भाजपाचे अनेक खासदार अधिवेशनाच्या काळात संसदेत हजर नसतात. याबाबत मोदींनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. आज पुन्हा त्यांनी खासदारांना ताकीद दिली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरु झाले असून २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. परंतू गदारोळामुळे दोन्ही सभागृहातील कामकाज सतत स्थगित करावे लागत आहे.
उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपल्याच पक्षाच्या खासदारांना केलेला उपदेश ते किती मनावर घेतात हे आता पहावे लागेल.
यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे स्वत: पंतप्रधान संसदेतील कामकाजाला फारसे गांभिर्याने घेत नाहीत, ते फार कमी वेळेस संसदेत येतात असा विरोधकांचा नेहमीचा आरोप आहे.