बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती मध्ये कोठेही रस्त्याच्या कडेला भिंतीच्या कडेला झाडावर किंवा इतरत्र कोठेही विजेच्या खांबावर जर तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात पत्रक चिकटवत असाल, तर सावधान! आता तुमच्यावर अदखलपात्र नाही, तर दखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो. विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
सध्या बारामती मध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्याचबरोबर बारामतीच्या सुशोभीकरणाचे प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये काही जण त्यांच्या व्यवसायाच्या जाहिराती बेकायदेशीरपणे भिंतीवर खांबावर झाडांच्या कडेला कोठेही चिकटवत आहेत किंवा खिळ्याने अडकवत आहेत.
याविरोधात बारामती शहर पोलिसांनी मोहीम सुरू केली असून यामध्ये चिकटणारे आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच ज्यांची भित्तीपत्रके या ठिकाणी असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान अनेक जण रस्त्याच्या कडेला, विजेच्या खांबावरती, पुलाच्या कडेला, बांधकामाच्या कॉंक्रिटचा तसेच कोठे जागा दिसेल त्या ठिकाणी पोस्टर चिकटवत आहेत. यापैकी अनेकांचे पोस्टरवरील मोबाईल क्रमांक घेऊन बारामती पोलिसांनी त्यांचा तपास करून त्यांना बोलावून घेऊन समज दिली आहे.
मंगळवारी संध्याकाळपर्यंत हे सर्व पोस्ट काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतरही पोस्टवर तसेच राहिल्यास अथवा कोणी नव्याने लावले, तर महाराष्ट्र विद्रूप विद्रुपीकरण कायदा कलम तीन प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच हा गुन्हा दखलपात्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.