इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सुरेश मिसाळ
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अनेक वर्षे संचालकपदी अधिराज्य गाजवणाऱ्या अप्पासाहेब जगदाळे यांनी बँकेच्या सन 2021 -26 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इंदापूर ‘ अ ‘ मतदार संघ तालुका प्रतिनिधी या मतदारसंघातून पुणे येथे सोमवारी ( दि.6 ) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. अनुभवी व कुशल संघटक म्हणून नावाजलेल्या अप्पासाहेब जगदाळे यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे राहिले असून विरोधकांना सुद्धा घाम फुटला असल्याचे दिसून येत आहे.
विद्यमान संचालक असलेले आप्पासाहेब जगदाळे हे गेली वीस वर्ष इंदापूर तालुका सोसायटी ‘ अ ‘ मतदारसंघातून बँकेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. निवडणूक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांच्याकडे आप्पासाहेब जगदाळे यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.इंदापूर तालुका ‘अ’ मतदारसंघातून अप्पासाहेब जगदाळे यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मोठी साथ लाभणार आहे.अप्पासाहेब जगदाळे यांचा एकतर्फी विजय निश्चित असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.