बारामती परिमंडलाची कामगिरी : ७ नवीन उपकेंद्रे तर ९ उपकेंद्राची क्षमता वाढ
प्रदीप जगदाळे: महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र शासनाने आणलेल्या ‘कृषीपंप धोरण-२०२०’ ची अंमलबजावणी करण्यात महावितरणचे बारामती परिमंडल राज्यात अग्रेसर राहिले आहे. आतापर्यंत या धोरणातून बारामतीने ५०२ कोटींचा टप्पा गाठला आहे.
धोरणातील तरतुदीनुसार वसूल झालेल्या रकमेतील ६६ टक्के ‘कृषी आकस्मिक निधी’चा वापर करुन तब्बल १९ हजार ७३७ कृषी जोडण्या देण्याचे व ७ नवीन उपकेंद्रे तसेच ९ उपकेंद्राची क्षमता वाढविण्यास मंजूरी देत कामास सुरुवात केली आहे. मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली ‘वसुली तिथे एक गाव, एक दिवस’ उपक्रम राबवून तेथील विजेच्या समस्या दूर करण्याचे काम बारामती परिमंडलात सुरू आहे. परिणाम स्वरुप नोव्हेंबर महिन्यात ५६ कोटी वसुली करण्यात यश मिळाले आहे.
बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके तसेच सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. परिमंडलात ७ लाख ३८ हजार २७६ कृषीपंप ग्राहक असून कृषी धोरण येण्यापूर्वी ८ हजार १५१ कोटींची थकबाकी होती. नवीन कृषी धोरणात निर्लेखणातून १३०३ कोटी व विलंब आकारात व व्याजात ९१९ कोटींची सूट मिळाली.
वीजबिलांच्या तक्रारी दूर करुन त्यातून आणखी ९९ कोटी कमी झाले. सप्टेंबर २०२० अखेर सुधारित थकबाकी ५९२९ कोटी व सप्टेंबर नंतरचे चालू बील १५४४ कोटी रुपये आहे. यात सुधारित थकबाकीतील फक्त ५० टक्के रक्कम येत्या मार्चपर्यंत भरायची आहे. तर चालू बिलाची १०० टक्के नियमितणे भरणे क्रमप्राप्त ठरते. थकबाकीच्या ५० टक्के व चालूबिलापोटी मिळून ४ हजार ४५९ भरणे आवश्यक असून, आतापर्यंत ५०२ कोटी वसूल झाले आहेत.
वसूल झालेल्या रक्कमेतून ३३ टक्के गावपातळीवर व ३३ टक्के निधी जिल्हापातळीवर विजेच्या पायाभूत सुविधेसाठी व नवीन कनेक्शनसाठी खर्च करण्यात येत आहे. थकबाकी, वसुली व आकस्मिक निधी याची तपशीलवार माहिती महावितरणच्या http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कृषी आकस्मिक निधीतून बारामतीमध्ये करंजे, कानगांव, कऱ्हावागज, दिवा, न्हावी, झगडेवाडी येथे नव्याने तर सुपा, शहापूर व कळस वीज उपकेंद्रांची क्षमता वाढ होणार आहे. सोलापूर मध्ये एकशीव येथे नवीन व कुडाळ, मोत्याळ व कोर्टी येथे क्षमता वाढ तर सातारा येथील कळवडे, उंडाळे व विंग उपकेंद्रांचीही क्षमता वाढ केली जाणार आहे.
कृषी जोडण्या देण्यासाठी ४५३ नवीन वितरण रोहित्रे उभारण्यात आली तर ३८३ रोहित्रांची क्षमता वाढवली आहे. उच्चदाब व लघुदाब मिळून १८६ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्या उभारल्या आहेत. परिणामी परिमंडलात १९ हजार ७३७ नवीन कृषी जोडण्या देण्याचे काम महावितरणने केले आहे. यामध्ये बारामती मंडलात ६१४२, सोलापूर ६८६८ तर सातारा मंडलात ६७२७ नवीन जोडण्या दिल्या आहेत. कृषी धोरणात राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन उपकेंद्रे व नवीन वीज जोडण्या देण्याचे काम एकट्या बारामती परिमंडलाने केले आहे. त्यासाठी ‘एक गाव, एक दिवस’, गावोगावी घेतलेल्या शेतकरी मेळाव्यामुळे हे साध्य झाले आहे.
तुम्ही बील भरा, आम्ही समस्या सोडवू- मुख्य अभियंता
सुनील पावडे, मुख्य अभियंता, महावितरण, बारामती परिमंडल : शेतीसाठी अखंडित वीज पाहिजे तर शेतकऱ्यांनी वीजबिल भरले पाहिजे. आतापर्यंत ११ टक्केच वसुली झाली आहे. शंभर टक्के वसुली झाली तर परिमंडलातील वीज समस्या दूर करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना ५० टक्के माफी मिळणार आहे. तसेच भरलेल्या रकमेतील ६६ टक्के रक्कमही जिल्ह्यातीलच कामाला वापरली जात असल्याने आतापर्यंत १९ हजार ७३७ जोडण्या देणे शक्य झाले.