पुणे : महान्यूज लाईव्ह
चक्क बलात्काराचा गुन्हा दाखल करू नये म्हणून एका महिलेचा तक्रारी अर्ज असताना महिला फौजदारानेच पैसे खाल्ल्याची घटना चार दिवसांपूर्वीच उघडकीस आली. त्या लाचखोरीची गुन्हा दाखल करणारी पेनाची शाही देखील वाळली नाही; तोच लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील शिपायाने ट्रॅव्हल्स गाडीवर कारवाई न करण्यासाठी एक महिन्याचा हप्ता म्हणून सहा हजार रुपयांची लाच मागितली..!
गेल्या काही महिन्यांमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अत्यंत धडाकेबाज सुरू आहे. काल लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस वाहतूक शाखेच्या पोलिस शिपाई सुहास भास्कर हजारे या 35 वर्षीय पोलीस शिपायाला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाचखोरीच्या प्रकरणातील तक्रारदार हा ट्रॅव्हल एजन्सी मध्ये मॅनेजर म्हणून काम करतो.
त्यांच्या एजन्सीच्या बसेस स्वारगेट पुणे ते सोलापूर अशी प्रवासी वाहतूक करतात. तक्रारदाराच्या ट्रॅव्हल्सच्या बसवर कारवाई न करण्यासाठी दर महिना सहा हजार रुपयांची लाचेची मागणी ही हजारे याने केली होती. तडजोडीअंती ही रक्कम पाच हजार रुपये ठरली. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. यावेळी केलेल्या पडताळणीत हजारे याने सहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे दिसून आले.
त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे, पुणे परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. या वेळी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना हजारे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.