
हातवळणकरांनी दिला गोपाळ समाजाला न्याय..
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील हातवळण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हर्षदा पवार यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी महेश गायकवाड यांनी ही निवड जाहीर केली. भीमा नदीकाठच्या हातवळण सारख्या छोटया गावाने भटक्या विमुक्त जाती जमाती मधील गोपाळ समाजाला सामाजिक न्याय देवून एक वेगळा आदर्श निर्माण केला. पुणे जिल्हात हर्षदा पवार यांनी गोपाळ समाजाच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून मान मिळवला आहे.
आज (ता.२४) हातवळण ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. सरपंच आशा म्हेत्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावर ही निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी हर्षदा पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी महेश गायकवाड, तलाठी शंकर दिवेकर व ग्रामसेविका एन. एच. शेलार यांनी काम पाहिले. दरम्यान ही निवडणूक प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत पार पडली. निवडीनंतर हर्षदा पवार यांचे गावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले










