
कोरोनामुक्त दौंड करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : तालुक्यात कोरोनाने बघता बघता शतक पार केले आहे. दौंड शहरासह तालुक्यात 23 जून पर्यंत कोरोना बाधीतांचा आकडा 115 वर जावून पोहचला आहे. दौंडला कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग व शासकीय यंत्रेणेसमोर मोठे आव्हान आहे.
दौंड शहरातील राज्य राखीव दलाचे जवान मुंबई येथून बंदोबस्तावरून आल्यानंतर जे कोरोनाचे सत्र सुरू झाले, ते कायम असून दररोज त्यात भर पडते आहे. कोरोनाचा संसर्ग दौंड शहरातील गल्ली बोळात दिवसेंदिवस वाढू लागला आणि त्याचे लोण तालुक्यातील ग्रामिण भागात जावून पोहचले. मुंबई पुणे वरून आलेल्या कोरोनाने ग्रामिण भागातील जनजीवन विस्कळीत केले.
दौंड मध्ये कोरोनाचे सावट संपता संपत नसल्याचे सध्याच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे. दौंड शहरात आजवर तब्बल 1184 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यात 94 जण कोरोना पॅाझीटिव्ह झाले असून, दौंड शहरातील नागरीकांसह राज्य राखीव दल 7 व 5 सह कोल्हापुर बटालियन व इतर दलाच्या जवानांचा समावेश आहे. तर तालुक्यात ग्रामिण भागात सुमारे 21 जण कोरोना पॅाझीटिव्ह झाले आहेत. सध्या शहरात अँक्टीव पॅाझीटिव्ह 25 जण असून तालुक्यात 19 अँक्टीव पॅाझिटिव्हची संख्या आहे. 23 जून पर्यंतची ही आकडेवारी आहे.
आरोग्य विभागाच्या दक्षतेमुळे व प्रयत्नामुळे आाता पर्यंत 64 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 6 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाने शतक जरी पार केले असले तरी महाभयंकर कोरोनाला हरवणारा आकडा ही समाधानकारक आहे.
सध्या दौंडच्या ग्रामिण भागात चितेंची बाब म्हणजे कोरोना विषाणु संसर्ग तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये वाढू लागला असल्याचे चित्र आहे. केडगाव, खुटबाब, बोरीपार्धी व पाटस सारख्या गावात कोरोना पोहचला आहे. विशेषत: वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याने जनमानसात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या संकटाला न डगमगता सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभाग आधार देत असून घाबरू नका तुम्हा फक्त घरी बसा आम्ही कोरोनाकडे बघतो असे आव्हान करीतआरोग्य विभागाची टिम कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज झाली आहे.
दौंड कोरोनाचे हॅाटस्पॅाट बनते काय याची एकीकडे चिंता आहे. तर दौंड कोरोनामुक्तीसाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तालुक्याचे आमदार राहुल कुल हे स्वत: लक्ष घालून अधिकारांची वेळोवेळी बैठका घेवून माहिती घेत आहेत. तर नियोजन, खबरदारी व उपाय योजना करण्याच्या सुचना देत आहेत. दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, जिल्हा ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॅा.संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॅा.अशोक रासगे यांची टिमही रात्रंदिवस कोरोनाविरोधात लढते आहे.
शासकीय यंत्रणा आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडीत असताना नागरीक मात्र सामाजिक भान व जाणीव न ठेवता बेफिकरीने वागत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना, मास्क तोंडाला न घातला फिरताना लोक खुलेआम दिसत आहेत. दुचाकीवर तिघेजण बसवून खुलेआम प्रवास करीत आहेत. चारचाकी वाहनांमध्ये ही असाच प्रवास करताना दिसत आहेत. शासनाने कारवाईचा बडगा उगरण्यापेक्षा कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेवून नागरीकांनी सामाजिक भान ठेवून खबरदारी व जबाबदारीने वागले पाहिजे एवढीच प्रशासनाची अपेक्षा आहे. अन्यथा तालुका कोरोना मुक्त होणे मुश्किल आहे.










