दौंड : महान्युज लाईव्ह
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केला असा आरोप करीत कोरोनाची उपमा देत खालच्या पातळीवर टिका केली होती. त्यावरुन राज्यभरात पडसाद उमटू लागलेत. पडकरांनी स्वत:च्या जीभेला लगाम द्यावा अन्यथा राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या त्यांना क्वारंटाईन करतील असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिला आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या शरद पवार यांच्यावरील टिकेचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी च्या पुणे जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी घेतला. नागवडे म्हणाल्या, सध्या काही लोकांना शरद पवारसाहेब यांच्यावर टिका करून पदे घेण्याची परंपरा आहे. ज्या पडळकर यांचे बारामतीत विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले होते; त्यांची बारामतीकरांनी चांगलीच जिरवली होती हे विसरू नये, पडळकर यांनी आता स्वतःहून क्वारटाईन व्हावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला कार्यकर्ता त्यांना क्वारटाईन करतील असा इशारा वैशाली नागवडे यांनी दिला आहे.










