दौंड : महान्युज लाईव्ह
दौंडच्या कुसेगाव माळवाडी भागात काही दिवसापासून बिबट्या शेळ्या मेंढ्यावर हल्ला करून त्यांची शिकार करीत असल्याने या भागात बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकरांसह कुसेगाव ग्रामपंचायतीने दौंड तालुका वनअधिकारी यांच्या कार्यालयाकडे केली आहे.
गेली अनेक वर्ष दौंड तालुक्यात बिबट्याचे वास्तव आहे. भीमा नदी काठच्या कानगाव, हातवळण, नानगाव, पारगाव,कडेठाण आदी भागात दिसणारा बिबट्या मध्यंतरी पुणे सोलापूर महामार्गालगतच्या पाटस, वरवंड भागात वावरत होता. बिबट्याने भीमा नदी लगतच्या गावांमधील उसाच्या पट्यात राहून शेतकरांची पाळीव जनावरांची शिकार केली होती. पाटस, वरवंड भागातही त्यांनी शेळी मेंढ्यावर हल्ला केला होता. तर एका बिबट्या पुणे सोलापूर महामार्गावरील वाहनांची धडक बसल्याने अपघातात मृत्यु झाल्याची घटना ही घडली होती.
सध्या डोंगराळ व वनविभागाच्या कुसेगाव व माळवाडी भागात बिबट्या दिसू लागला आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या शेळ्यावर हल्ला करून त्यांची शिकारही या बिबट्याने केली आहे. यापरिसरात मागील अनेक दिवसापासून बिबट्या वावरत असल्याचे शेतकरांनी पाहिले आहे. परिणामी या भागात शेतात कामे करताना शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात कामे करण्यासाठी महिला शेतकरी व मजुर वर्ग जाण्यास तयार नाही. दरम्यान या बिबट्या वनविभागाने तातडीने जेरबंद करण्यासाठी या भागाची पाहणी करून पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.










