राजेंद्र झेंडे, महान्यूज लाई्व्ह
दौंड : यवत पोलीस स्टेशनाला फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या एक आरोपी दौंड न्यायालयात हजर करून यवत जात असताना पुणे सोलापुर महामार्गावर पाटस – आणि वरवंड जवळ असलेल्या कौवठीचा मळा येथील हॅाटेलवर चहापाण्यासाठी थांबले असता आरोपीने बघता बघता पोलीसांच्या हातावर तुरी देवून पळ काढला. पोलीस मात्र त्याकडे बघत राहिले..!
या प्रकाराने यवत पोलीसांची एकच धांदल उडाली असून यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह यवत आणि पाटस पोलीस चौकीचे अधिकारी आणि कर्मचारी या आरोपीचा शोध घेत आहेत.
दौंड तालुक्यातील खामगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी संदिप शांताराम जगताप यांच्या ऊसास तोडणीसाठी मजुर आणण्यासाठी 12 लाख रुपये उच्चल घेवून ही उस तोडणी मजुर न पुरवल्याने मुकदामास फसवणुक केल्याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनला 24 आॅगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी आबासाहेब सुखदेव बागुल (रा. चिंचगव्हाण, ता.चाळीसगांव, जि. जळगाव)असे या मुकादम आरोपीला यवत पोलीसांनी जळगावमधून अटक केले होते. आज शनिवारी (दि.28) यवत पोलीसांनी या आरोपीस दौंड न्यायालयात हजर केले होते.
दौंड न्यायालतून या आरोपीस यवत पोलीस स्टेशनला जात असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वरवंड हद्दीतील कौठडीचा मळा येथील एका हॅाटेल मध्ये चहा पाण्यासाठी थांबले असता आरोपीने काही क्षणात पोलीसांच्या हातावर तुरी मारून तेथून पळ काढला.
शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकारामुळे पोलीसांची एकच धांदल उडाली. या आरोपीच्या शोधासाठी पाटस टोल नाका, बारामती फाटा,चौफुला, सुपा रोड आदी भागात पोलीस फौज फाटा तैनात केला आहे. तर वरवंड आणि कौठडीचा मळा परिसरात उसाच्या शेतात पोलीस, पोलीस मित्र, ग्रामस्थ शोध घेत आहेत.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पाटस पोलीस चौकीचे उपपोलीस निरीक्षक संजय नागरगोजे आणि पोलीस कर्मचारी वरवंड आणि पाटस परिसरात ऊसाचे शेत, ओढा यामध्ये मागील तीन तासापासून शोधमोहीम सुरू आहे.











