औदुंबर क्षीरसागर, करमाळा
करमाळा तालुक्यात सरपंचाच्या पतीने थेट पंचायत समितीच्या कार्यालयात गावच्या ग्रामसेवकाला मारहाण करण्याची घटना घडली. सरपंचाबद्दल वरिष्ठ कार्यालयात काही पण रिपोर्ट देत असल्याबद्दल चिडून सरपंचाच्या पतीने ग्रामसेवकाला मारहाण केली. याप्रकरणी सरपंचाच्या पतीवर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
चिखलठाण नंबर 2 येथील ग्रामसेवक अंगद बळीराम सरडे यांना राजेंद्र रूपचंद जाधव (रा. करंजे ता. करमाळा) यांनी मारहाण केली. राजेंद्र जाधव हे करंजे गावच्या सरपंच यांचे पती आहेत. हा प्रकार काल करमाळ्याच्या पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांच्या कक्षात घडला.
जाधव यांनी सरडे यांना सरपंचाबद्दल कसलेही रिपोर्ट पाठवता. माझी पत्नी सरपंच आहे, मी तिचा नवरा आहे. सरपंचाला हजर राहण्याबाबत नोटीस का देतो? असे म्हणत शिवीगाळ केली व अंगावर धावून जाऊन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशी फिर्याद सरडे यांनी केली.
त्यावरून करमाळा पोलिसांनी जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक सचिन जगताप करत आहेत.