राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : व्याजाने दिलेले पैसे दिले नाही म्हणून आलिशान वाहनात नेऊन खाजगी सावकाराने मारहाण केल्याची घटना घडली, याप्रकरणी दौंड पोलिसांनी खासगी सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अमित बारवकर (रा. समता नगर,दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या खाजगी सावकाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील लक्ष्मण शितोळे (रा. अमर सोसायटी, दौंड) यांनी मित्राच्या मध्यस्थीने अमित बारवकर याच्याकडून 50 हजार रुपये प्रति महिना 5 हजार रुपये दराने व्याजाने घेतले होते, ते व्याजाचे पैसे परत मिळावे यासाठी या सावकाराने वारंवार तगादा लावला. मात्र पैसे मिळत नसल्याने मंगळवारी (दि 22 ) या सावकाराने याने सुनिलला जबरदस्तीने आपल्या चार चाकी वाहनात बसवून गोपाळवाडी रोड परिसरातील समता नगर व पुष्प लक्ष्मी हॉस्पिटल परिसरात नेऊन जबर मारहाण केली. या मारहाणीत सुनील हे जखमी झाले.
या प्रकरणी सुनिल शितोळे यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलीसांनी अमित बारवकर याच्या विरोधात खाजगी सावकारी, अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास दौंड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करीत आहेत.











