राज्यात आजमितीस केवळ २८ हजार ४५४ जणांवरच उपचार सुरू
मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ४१ हजार ७०० वर पोचली असून नव्याने २१ मे रोजी २३४५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अर्थात त्याच वेळी राज्यात एकाच दिवसात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही १४०८ एवढी आहे.
राज्यात ११ हजार ७२६ जण आजवर कोरोनामुक्त झाले असून राज्यात आजमितीस २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही दिलासादायक माहिती आज दिली. राज्यात आजवर १४५४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र राज्यातील ३ लाख २० हजार नमुन्यांपैकी २ लाख ८० हजार नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
राज्यात जरी सध्या कोरोनाचे रुग्ण सापडत असले तरी प्रकर्षाने होत असलेल्या चाचण्यांमुळे नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. येत्या काही दिवसांत दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये घट येत जाईल अशी चिन्हे आहेत. राज्यात सध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आले असून रेड झोन व बिगर रेड झोन या दोनच गटांमुळे सध्या बाजारातील व्यवहारालाही गती आली आहे.











