मुंबई : महान्यूज लाईव्ह
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकासंदर्भात राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करीत कुबेर यांच्या हेतूवर शंका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना बाजीराव पेशव्यासोबत करण्यामागे कुबेरांना नेमके काय साध्य करायचे आहे असा प्रश्न त्यांनी केला आहे. पुस्तकावर आक्षेप आले की, प्रसिध्दी व खपाची विक्री वाढून अमाप पैसा मिळतो असा उद्देश लेखकाचा असेल तर ते गंभीर आहे असे मत मिटकरी यांनी व्यक्त केले आहे.
कुबेर यांनी लिहीलेल्या रेनायसन्स स्टेट (renaissance state) पुस्तकातील ७६ व्या क्रमांकाच्या पानातील उतारा अमोल मिटकरी यांनी ट्विट करीत कुबेर यांना लक्ष्य केले आहे. या पुस्तकाची शहानिशा करून कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान यामुळे भविष्यात नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मिटकरी यांनी या पुस्तकावर बंदीची व कुबेर यांच्यावर कारवाईची मागणी पावसाळ्यात करणार असल्याचे म्हटले आहे.











