डॉ महेश घोळवे : महान्यूज लाइव्ह
देशवासीयांना मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल किती अपार प्रेम असते, याचे उदाहरण नुकतेच बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे पाहायला मिळाले. येथील जवान विजय पोंद्कुले यांना नुकतेच काश्मीर मध्ये देशसेवा करताना वीर मरण आले. ही बातमी गावात समजताच पूर्ण गावात शोककळा पसरली.
शहीद पोंद्कुले यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, अख्खे कुटुंब फक्त एका छोट्या खोलीत निवारा करते. त्यांच्या पाठीमागे त्यांची आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
त्यामुळे यावरती फक्त हळहळ व्यक्त न करता पुर्ण परिवारासाठी काहीतरी ठोस उपाय करण्याचे सर्व गावकऱ्यांनी व सोशल मीडियावरील मित्रांनी मिळून ठरवले. त्यामध्ये गावचे सुपुत्र असलेले डॉ अतुल पिसाळ व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत सर्वांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. रातोरात या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद भेटत गावकऱ्यांनी तब्बल एक लाख 91 हजार एवढी प्रचंड रक्कम गोळा करून त्याची अनामत रक्कम वीर शहीद जवानाच्या पत्नी व मुलीच्या नावाने केली. तसेच डॉक्टर अतुल पिसाळ यांनी त्या कुटुंबियांसाठी आजीवन मोफत उपचार करण्याचे जाहीर केले आहे.
देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सीमेवरती उभ्या असलेल्या जवानांविषयी ही कृतज्ञतेची पोचपावती आहे असे मत जवानाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले.











