औदुंबर क्षीरसागर : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील रावगाव आणि वंजारवाडी या गावांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना महावितरणच्या तांत्रिक दोषामुळे आज दुर्देवी बळी गेला वर काम करत असताना अचानक वीजप्रवाह चालू होऊन नितीन पाटील या वीज कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
आज सकाळी नितीन पाटील हे शेळके वस्ती दगडवाडी या दरम्यानचा वीज पुरवठा सुरळीत करत असताना, अचानक विद्युत रोहित्र आत वीज प्रवाह सुरू झाला. त्यात उच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे नितीन पाटील यांचा एका सेकंदाच्या आत जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले. वीज वितरण कंपनीने संबंधित कर्मचार्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि या कुटुंबाची जबाबदारी महावितरण जोपर्यंत घेत नाही, तोपर्यंत आम्ही पुढील प्रक्रिया होऊ देणार नाही असे संतप्तपणे सांगितल्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी यासंदर्भात आश्वासन दिले. या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर, पाटील यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.
अशीच घटना काही दिवसांपूर्वी खटाव तालुक्याच्या परिसरात देखील घडली होती, परंतु या मधील वीज कर्मचारी जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो पूर्ववत कामावर रुजू झाला, मात्र करमाळ्यातील या घटनेमध्ये वीज कर्मचाऱ्यांचा नाहक जीव गेल्याने वीज वितरण कंपनीच्या एकूण कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.











