संबंधित कुटुंबीयांना क्वारंटाईन ठेवणार; नांगरिकांनीही काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील कोरोनाबाधित रिक्षाचालकाच्या कुटुंबातील आठही सदस्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. मात्र या सदस्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात 14 दिवसांसाठी आणि नंतरच्या काळात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाईन केले जाणार आहे. दरम्यान, नागरिकांनी अजूनही घराबाहेर न पडता शासनाच्या नियमांचे अधिकाधिक पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
बारामती शहरातील श्रीरामनगर येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाने कठोर पावले उचलत जवळपास पाच किमी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी, औषध फवारणी, निर्जंतुकीकरण अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संबंधित रुग्णाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोकांची पुण्यातील नायडू रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यामध्ये या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे धास्तावलेल्या बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.
या रुग्णाच्या कुटुंबीयांना सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतरच्या काळात त्यांच्या घरीच क्वारंटाईन ठेवून विशेष दक्षता घेतली जाणार आहे. दरम्यान, बारामतीकरांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. मात्र तरीही प्रशासनाने अजूनही नागरिकांनी दक्षता घेऊन घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या काळात नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेऊन स्वत:सह कुटुंबियांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही याबद्दल दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरजा वगळता नाहक घराबाहेर पडून यंत्रणेला वेठीस धरू नये असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.










