संकट काळातल्या मदतीमुळे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मानले आभार..!
बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा अहोरात्र झटत आहे. बारामतीत कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी काही लोकांना आवाहन केले. बारामती सायकल क्लब, क्रेडाई, अविनाश लगड, सचिन सावंत आणि गिरीश कोरे यांनी साद देत पोलिस कर्मचाऱ्यांच्या जेवणासह चहापाणी, नाष्ट्याची सोय करत पोलिस मित्रांच्या कामाला तत्पर साद दिली.
राज्यात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर बारामतीत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता, हॉटेल, खाणावळी बंद आहेत. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या जेवणाचा गहन प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी बारामती सायकल क्लबला जेवण देण्याबाबत आवाहन केले. त्यांनी लगेच प्रतिसाद देत पहिल्या दिवसापासून पोलिस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली असून ती आजतागायत सुरू आहे. विशेष म्हणजे कर्मचारी तैनात असलेल्या स्थळावर त्यांना जेवण पोहोच करण्याचे काम बारामती सायकल क्लबच्या माध्यमातून होत आहे.
दुसरीकडे आज जेवणासाठी रिकाम्या डब्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर क्रेडाई आणि या संघटनेतील सदस्यांनी तात्काळ १८ हजार रुपयांची रोख मदत देत पुढील पंधरा दिवसांच्या रिकाम्या डब्यांचा प्रश्न सोडवला आहे. श्रीरामनगरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र लागू करून त्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वडुजकर इस्टेट, भिगवण रोड आणि श्रीरामनगर परिसरात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस खात्याकडून चहा व नाष्टा दिला जात आहे. परंतु बारामती बँकेचे उपाध्यक्ष अविनाश लगड, त्यांचे मित्र सचिन सावंत आणि गिरीश कोरे यांनी मिळून आजपासून येथील कर्मचाऱ्यांना बंदोबस्त स्थळी जाऊन चहा व नाष्टा देण्याची सोय केली आहे.
एकूणच संकटाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलिसांसाठी हाक देताच बारामतीतील अनेकजण प्रतिसाद देत असल्याबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी आभार मानले आहेत. वास्तविक पोलिस खात्यातील प्रत्येकजण ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याच गोष्टीची तमा न बाळगता काम करत असतो. अशावेळी समाजातील संवेदनशील लोक मदतीला धाऊन येतात ही समाधानकारक बाब असल्याचेही शिरगावकर यांनी सांगितले.










