पुणे : महान्यूज लाईव्ह
सुरुवातीला देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईल म्हणत होते. आता दुसरे म्हणतात की मी कोल्हापूरला परत जाईन, पण परत जाईन म्हणायला त्यांना पुणेकरांनी पण कुठे बोलावलं नव्हतं! लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं कोथरूडची काम झाली पाहिजेत.. असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
पुण्यातील बँकांच्या सीएसआर फंडातून झालेल्या सुविधांची लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यावेळी त्यांनी वरील टीकास्त्र सोडले. पुण्यातील विधानभवनात बँकांकडून रुग्णवाहिकांचे लोकार्पण अजित पवार यांनी केले.
त्यावेळी ते म्हणाले, उद्या कोथरूड मधून जर लोक काम घेऊन गेले तर मी परत जाणार आहे असे ते सांगतील असे म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचा स्फोट झाला.
पवार म्हणाले, जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत आहे, तर शेतकरी दिल्लीमध्ये उतरून आंदोलन का करीत आहेत? एवढ्या थंडीत आंदोलने सुरू आहेत. त्याचे आत्मपरीक्षण सरकारने आणि सरकारमधील पक्षांच्या नेत्यांनी केले पाहिजे. महाराष्ट्रात काहीजण बैलगाडीत बसून फोटो काढतात, मात्र महाराष्ट्रातूनही शेतकरी दिल्लीला गेले आहेत याची जाणीव ठेवली गेली पाहिजे.











